अक्कलकुवा : देवमोगरा पुनर्वसन येथील अनुदानित आश्रम शाळेच्या परिसरात विरेंद्र वळवी या विद्यार्थ्याने शनिवार, २० रोजी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमोरे व पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील मालपाडा येथील विरेंद्र धरमसिंग वळवी हा विद्यार्थी देवमोगरा पुनर्वसन अनुदानित आश्रम शाळेत बारावीचे शिक्षण घेत होता. शनिवार, २० रोजी शाळेच्या परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याच्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनेच्या दिवशी या विद्यार्थ्याने वडील व परीवारातील इतर सदस्यासोबत भ्रमणध्वनीव्दारे नेहमीप्रमाणे वार्तालाप केली होती. त्यावेळी परीवारातील कोणत्याही सदस्याला त्याची मानसिकताबाबत कूठलाही बदल दिसून आला नाही. हा विद्यार्थी होतकरु व शांत स्वभावाचा आणि संयमी होता. तो अशी टोकाची भूमीका घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांचे कुटूंबियांसह मित्रांनी व्यक्त केली.
घटनास्थळाचे निरीक्षण केले असता विद्यार्थ्याचे पाय दुमडून खाली जमीनीला टेकत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या ठिकाणी फासी घेता समयीचा पायांचा कुठल्याही खुणा जमीनीवर दिसून येत नाहीत. त्यामुळे ही घटना संशयास्पद असून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी. शिवाय, मृत विद्यार्थ्याच्या पालकास शालेय समिती तथा शासनाने व आदिवासी विकास विभागांतर्गत ५० लाखाची नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अॅड. रुपसिंग वसावे, अॅड संग्राम पाडवी, अॅड.गजमल वसावे, माजी.जि.प.स. किरसिंग वसावे, गजानन वसावे, अॅड.जितेंद्र वसावे, जयवंत पाडवी, दिलीप वसावे, माकत्या वसावे, नरपत वसावे यांच्यसह ग्रामस्थ तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.