पाचोरा : तालुक्यातील आसनखेडा बुद्रुक येथे सुशोभीकरणाच्या सुरु असलेल्या बांधकामाची तोडफोड करण्यात आल्याची घटना बुधवार, २९ रोजी घडली. या सुशोभीकरण बांधकामास ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेच्या ठरावाला काही स्थानिकांचा विरोध होता. यातून मध्यरात्री अज्ञातांकडून हे कृत्य करण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध ४२७ कलमाखाली तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक गावात सुशोभीकरणासाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या सुशोभीकरणाच्या जागा उपलब्ध करून तसा ठराव मंजूर करून देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतींची होती.
या आसनखेडा बुद्रुक येथील शिवस्मारक सुशोभीकरणाच्या कामासाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर बाजार पट्ट्याची जागा निश्चित केली होती. परंतु काही ठराविक घटकांकडून या जागेबाबत विरोध होत असल्याने या सुशोभीकरणाच्या कामाची नासधूस करण्यात आली आहे. या ठिकाणाहून बांधकाम साहित्याची ही चोरी झाल्याची तक्रार संबंधित ठेकेदार दिनेश सैदाणे यांनी पाचोरा पोलीसात केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध ४२७ कलमाखाली तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.