आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाचा मोठा झटका

गांधीनगर : अनुयायी तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी आसारामला ही शिक्षा सुनावली.

सोमवारी न्यायालयाने आसारामला या प्रकरणात दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, आसारामला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आसाराम सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.

प्रकरण नेमकं काय?
महिला शिष्या बलात्काराचं प्रकरण २२ वर्षे जुने आहे. ऑक्टोबर २००१ मध्ये सूरतमधील आश्रमात एका शिष्यावर अत्याचार  केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. आसारामची शिष्य असलेल्या पीडितेने एकूण सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी गांधीनगरच्या सत्र न्यायालयात सुरू होती. २९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले होते, तर अन्य सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.