पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जाणार आहे. मात्र यावरून मविआच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत पवारांना या पुरस्कार सोहळ्यासाठी एका मंचावर बसू नये अशी विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या पुरस्कारावरून केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त़्वाला मान्य केलं आहे. आता शरद पवार यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार दिला जात आहे यावरून स्पष्ट होतं की इंडियाही मोदींसोबत आहे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
शरद पवारांच्या हस्ते मोदींचा सत्कार हे समजल्यावर मविआमधील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोदींच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्याआधी पवारांनी थोडा विचार करावा. रोहित टिळक यांना समज देण्यात आलीये, हेवे दावे सोडून मोदींच्या पुरस्काराला विरोध करणं गरजेचं असल्याचं आवाहन काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यासोबतच संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमधील नेते अशा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील तेव्हा संभ्रम निर्माण होईल. शरद पवार इतके अनुभवी नेते आहेत की संभ्रम काय होईल हे आम्ही सांगयची गरज नाही. महाविकास घट्ट आहेच त्यापेक्षा जास्त इंडिया असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना, शरद पवारांचं पुरस्काराला उपस्थित राहणं हे राजकीय दृष्टीने पाहू नये, असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, पुरस्कार सोहळ्याला मविआ नेत्यांनी जाहीरपणे पवारांना जावू नये असं म्हटल्यामुळे शरद पवार जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.