इंडिया आघाडीत बिघाडी… काय घडलं?

इंडिया आघाडीने नुकतेच एक निवदेन प्रसिद्ध करुन अनेक टीव्‍ही न्‍यूज अँकरवर बहिष्‍कार घालण्‍याची घोषणा केली आहे. बहिष्‍कार घालण्‍यात आलेल्‍या टीव्‍ही न्‍यूज अँकरच्‍या कार्यक्रमात सहभागी न होण्‍याचा निर्धार केला आहे. याबाबत आज बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. विशेषतः नितीश कुमारांच्या या वेगळ्याच भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होतंय.

शनिवारी माध्यम प्रतिनिधींनी नितीश कुमार यांना पत्रकारांच्या बहिष्काराबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी पत्रकारांच्या समर्थनात आहे. जेव्हा पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा ते जे योग्य आहे तेच मांडतील.

पत्रकारांना त्यांचे अधिकार आहेत, मी कोणाच्या विरोधात नाही. सध्या जे केंद्रामध्ये आहेत त्यांनी काही लोकांवर नियंत्रण ठेवले आहे आणि जे आपल्यासोबत आहेत त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल. परंतु मी कोणाच्याही विरोधात नाही. जर पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य असेल तर ते जे आवडेल ते लिहितील. प्रत्येकाला आपले अधिकार आहेत, अशा शब्दांमध्ये नितीश कुमारांनी बाजू मांडली.

नितीश कुमार यांच्या या विधानामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झालीय का? सहकारी पक्षांना विचारुन निर्णय घेतले जात नाहीत का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. आणखी किती पक्ष बहिष्काराच्या भूमिकेच्या बाजूने आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.