---Advertisement---
इंडी आघाडीतील दोन मोठ्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन… वाचा काय घडतंय ?
Updated On: एप्रिल 29, 2024 11:17 am

विरोधी पक्षाच्या इंडी आघाडीतील दोन मोठ्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन वादाला तोंड फुटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने ४२ पैकी २ जागा काँग्रेसला देण्यास सहमती दर्शवली आहे. पण काँग्रेसचे इतक्या कमी जागांवर समाधान झालेले नाही.
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी आम्हाला ममता बॅनर्जी यांच्या भिकेची गरज नसल्याचे विधान केले आहे. ते म्हणाले की, “आम्हाला त्यांच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत. त्यांना युती नको आहे कारण युती झाली नाही तर मोदींना आनंद होईल आणि ममता बॅनर्जी त्यांची सेवा करण्यात मग्न आहेत.”
पश्चिम बंगालमध्ये इंडी आघाडीतील तीन घटक पक्ष आहेत. डाव्या विचारसरणीचा सीपीएम, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस. तीन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले आहेत. ४२ लोकसभेच्या जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बनर्जींच्या पक्षाचे २२ खासदार आहेत, तर काँग्रेसचे दोन खासदार आहेत. तर ३४ वर्ष सत्तेत राहिलेली सीपीएमचा पश्चिम बंगालमध्ये एकही खासदार नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी काँग्रेसला आणि डाव्या पक्षाला जागा सोडण्यास उत्सुक नाहीत.