उत्तराखंडमध्ये एका मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली असून आरोपी तरुणानेही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिद्वार-डेहराडून महामार्गावरील तीन वॉटर कल्व्हर्टजवळील जंगलात सोमवारी एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. ही माहिती मिळताच रायवाला पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र चौधरी यांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
आरती डबराल असे या तरुणीचे नाव असून, ती सध्या डेहराडूनच्या सिटी कोतवाली येथे उपनिरीक्षक म्हणू कार्यरत असलेले शिवप्रसाद डबराल यांची मुलगी आहे. तपासादरम्यान संशयित तरुणाने चिल्ला कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. शैलेंद्र भट्ट असे या तरुणाचे नाव आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी जोडल्या जात असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत. तरुण आणि तरुणीच्या कुटुंबीयांकडून दोघांचीही माहिती घेतली जात आहे.
डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती गोळा केली आणि या अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे. जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत. पोलीस जेव्हा मुलीच्या मृतदेहाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की मुलगी पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. सध्या मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे कपडे पाहून ही मुलगी चांगल्या कुटुंबातील असल्याचे पोलिसांना समजले. मुलीचे फोटो जिल्हाभरातील पोलिसांच्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आले आहेत. हे छायाचित्र पाठवल्यानंतर तरुणीची ओळख आरती डबराल अशी झाली आहे, ती डेहराडून शहर कोतवाली येथे तैनात उपनिरीक्षक शिवप्रसाद डबराल यांची मुलगी आहे