मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. प्रशासनाकडून दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावरुन मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आवाहन केलंय. अजित पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते साजरा करतात. यंदा हा खर्च न करता इर्शाळवाडीच्या पुनर्उभारणी करण्यात खर्च करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये.
पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.