इलेक्ट्रिक एसटी बसकरिता आता १७० ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन

तरुण भारत लाईव्ह न्यूज । नागपूर : राज्य परिवहन महामंडळाकरिता  नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी  रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सन २०१६-१७ पासून २९२१-२२ या कालावधीत एसटी महामंडळाने ३२३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर ते २६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने २ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. 700 बसेस मध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निम-आरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेस पैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडी बिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एस. टी.बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमंडळामार्फत दूर केल्या जातील, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या उत्तरात सांगितले.