इस्रायल-हमासचं युध्द! भारताचं तब्बल 2.42 लाख कोटींचं नुकसान

इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सोमवारच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 407.19 अंकांनी घसरून 65,588.44 अंकांवर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 142.70 अंकांच्या घसरणीसह 19,510.80 अंकांवर व्यवहार करत …

भारतीय शेअर बाजारातील या घसरणीमुळे सुरुवातीच्या सत्रात बीएसईचे मार्केट कॅप 2.42 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3,19,86,272.55 रुपये होते. जो सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 3,17,43,330.93 रुपयांवर आला. सोमवारी सकाळी 9.15 ते 11 या वेळेत बाजारातून सुमारे 2.42 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजार तज्ज्ञांच्या मते, इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे, त्यामुळे गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळत आहेत. आज बाजारात ज्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, टायटन, इंडसइंड बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि सन फार्मा यांचे शेअर्स नफ्यात व्यवहार करत होते.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम केवळ भारतीय बाजारावरच नाही तर इतर आशियाई बाजारांवरही दिसून आला. इतर आशियाई बाजारांमध्येही घसरणीचा कल दिसून आला. मात्र, शुक्रवारी युरोपीय बाजार तेजीसह बंद झाले. शुक्रवारी अमेरिकन बाजारही नफ्यात होते. पण आज जेव्हा हे बाजार संध्याकाळी उघडतील तेव्हा तिथे काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहावे लागेल. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक लेबलवर ब्रेंट क्रूड 3.68 टक्क्यांनी वाढून $87.69 प्रति बॅरलवर पोहोचले आहे. यापूर्वी शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 90.29 कोटी रुपयांचे समभाग विकले होते.