हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे. तसेच ३ लाखांहून अधिक राखीव सैनिकांना परत बोलवले आहे. येथील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व राखीव सैनिक आता युद्धासाठी मैदानात उतरले आहेत.
यातच इस्त्रायल संरक्षण दलातील सर्वात वयस्क असलेले एझरा याचिन हेदेखील युद्धात आपला वाटा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. जेरुसलेम येथील एझरा याचिन हे ९५ वर्षांचे आहेत. इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धात सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी या वयोवृद्ध सैनिकाचा राखीव दलात समावेश करण्यात आला आहे.
त्यांचे बालपण जेरुसलेममधील दंगली आणि त्रासदायक घटनांनी भरलेले होते. तरीसुद्धा खचून न जाता इस्त्रायलला एक महान राष्ट्र बनवण्यात ते आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. “हार मानू नका, आता तर मुळीच नाही,” असा संदेश एझरा याचिन यांनी सैनिकांना दिला आहे.
सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्त्रायलमध्ये १८ वर्षावरील सर्व नागरिकांना सैन्यात सेवा देणे बंधनकारक आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात हजारो इस्त्रायली ठार झाले असून असंख्य नागरिक जखमी आहेत.