ईडीकडून ईडीच्याच वरिष्ठ अधिकार्‍याला अटक; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : आतापर्यंत राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात होती. पण आता ईडीचेच माजी कर्मचारीही ईडीच्या रडावर आल्याचं दिसून येत आहे. कारण ज्येष्ठ आयआरएस अधिकारी आणि ईडीचे माजी वरिष्ठ अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. छापेमारीनंतर ईडीकडून सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. ५०० कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं एफआयआर दाखल केली. आणि याच प्रकरणी काल ईडीनं छापेमारी केली होती.

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन २ मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे ५०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ईडी मध्ये असताना त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं सचिन सावंत यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवालची नोंद केली होती. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे.