जळगाव । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा ४३ अंशांच्च्या पुढे गेल्याने असह्य करणारा उकाडा जाणवत असून यामुळे जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहे. दरम्यान, येत्या शनिवारी (४ मे) जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
जळगाव शहर हॉट सिटी म्हणून प्रसिद्ध असून, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. एप्रिल महिन्याच्या तीसपैकी नऊ दिवस पारा चाळीशीपार राहीला आहे, तर १८ एप्रिल रोजी कमाल तापमान २१ अंशांवर होते.
एप्रिल महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी तापमान ४३.४ अंशांवर होते. आज मंगळवारी देखील पारा तेवढाच तापणार आहे. दरम्यान, शनिवारी (४ मे) जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपुढे जाणार आहे.
सध्याच्या उन्हाच्या झळांमुळे घरात बसून देखील उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तापमान ४३ अंशावर असल्याने जळगावकर हैराण झाले आहेत. जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढतच असून, घराबाहेर होरपळून टाकणारे ऊन तर घरात असह्य उकाडा अशा दुहेरी परिस्थिती जळगावकर बेहाल झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज असलयाने दुपारच्या वेळेस घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवा, डोक्यावर रूमाल बांधा असा सल्ला येथील जीएमसीच्या डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी सर्वात थंड, यंदा मात्र हॉट…
गेल्यावर्षी उन्हाळ्यातील मार्च व एप्रिल हे दोन महिने मिळून तब्बल ४६ दिवस ढगाळ वातावरण कायम होते. त्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाळा असूनही पारा ३७ ते ३९ अंशापर्यंत राहिला होता. त्यामुळे अनेक वर्षानंतर २०२३ या वर्षाचा उन्हाळा थंड ठरला होता.मात्र, यंदा मार्च महिन्यात दिलासा मिळाला असला तरी एप्रिल महिना मात्र चांगलाच हॉट ठरला आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातील दिवसाच्या तापमानाची सरासरी ३९ अंश इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या सरासरीत ३ ते ४ अंशाची वाढ झाली आहे.