उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा ; IMD कडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

जळगाव । हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने आज उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हिवाळी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाने राज्यभरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. याच दरम्यान राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आज अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता
आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाणारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीटीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.