उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सहानुभूतीची लाट आली पण तोच निर्णय अंगलट आला

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा शिवसेना ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हाच राजीनाम्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला असून सरकार वाचले आहे. ‘सर्वकाही चुकलं पण उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे सरकार वाचलं’ असा काहीसा निकाल समोर आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं हेच महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट आलं आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकता आणि भावनिकेच्या भरात राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्रात ठाकरेंच्याबाजुने सहानुभूतीचा लाट निर्माण झाली होती. उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण झालं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचं कौतुकही झालं. मात्र, आता त्यांचा राजीनाम्याचा निर्णयच त्यांच्या अंगलट आला आहे.

केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यास आणि मुख्यमंत्री निवडण्यात कायदेशीर अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे, विद्यमान शिंदे सरकार कायम राहिलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची शाबूत आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी सरकार परत आणता आलं असतं, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. भावनेच्या भरात दिलेला राजीनामा कायदेशीर कचाट्यात अडकला आणि शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला.