उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा पोलिसांनीच दिला इशारा, काय घडतंय?

मुंबई : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा इशारा मुंब्रा पोलिसांनीच दिला आहे. मुंब्रा परिसरात ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स फाडण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीने पाडलेल्या शाखेचे नुकतेच भुमिपुजन केले आहे.
या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मुंब्रा ते ठाणे या भागात बॅनर लावले होते. त्यातील ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील, अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,”असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे”,अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते.”
“आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,”उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!” असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत. “मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!” असं आव्हाड म्हणाले.