उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सत्तेत येऊन काय केले ?

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सत्तेत असताना केलेल्या कामाचा पाढाच वाचला. निलेश राणे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे आणि राऊतांबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
निलेश राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने सत्तेत येऊन काय केले तर, ठाकरेंनी मुलाला मंत्री केलं आणि संजय राऊतांनी मुलीचं लग्न केलं. विरोधकांची घरे पाडण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय मुलाने नाईट लाईफच्या नावाखाली मर्डर रेप दारू पार्टी ड्रग्स असा धुमाकुळ घातला,” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी गळ्यात पट्टा घालून आजारपणाचा आव आणला. पण सत्ता गेली आणि त्यांचा पट्टा गायब झाला. सोशल मीडियावर साधी टीका करणारे वयोवृद्ध, तरुण आणि महिलांना घराबाहेर खेचून मारण्यात आले. बायकोच्या आणि कुटुंबाच्या नावावर अलिबाग आणि इतर ठिकाणी बेनामी जमीन अचानक ठाकरे आणि राऊत कुटुंबाची झाली.”
“कोरोनाच्या नावावर भ्रष्टाचार तर सांगायला नको. यातून मातोश्री २ उभे राहिले. तसेच हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब ठाकरे झाले. त्यामुळे असे सडलेले लोक महाराष्ट्रात, देशात नको आणि सत्तेत तर मुळीच नको,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.