नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे. उद्धव ठाकरे सभागृहात येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील एन्ट्रीपूर्वीच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या शाब्दिक लढाईचा श्रीगणेशा केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त हजेरी लावण्यापुरते हिवाळी अधिवेशनाला येत असल्याचे त्यांनी म्हटले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आज सभागृहात येणार आहेत. तुम्ही त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. आमदार म्हणून अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे सभागृहात येत आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभागृहात येणार आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांना शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांबद्दल अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आता या टीकेला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.