उद्याचा महाराष्ट्र बंद कसा असेल? उद्धव ठाकरेंनी सांगितले काय बंद काय सुरु राहणार? 

मुंबई ।बदलापूर येथील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात मोर्चे आंदोलन केली जात आहे. यातच बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद नेमका कसा असेल याबाबतची माहिती शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली. शनिवारचा महाराष्ट्र बंद हा दुपारी २ वाजेपर्यंत पाळावा, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात यावी, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्याचा महाराष्ट्र बंद हा संकृती विरुद्ध विकृती असल्यामुळे सर्वांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेय. त्याशिवाय मुंबईतील लोकल, बेस्ट बससेवा बंद ठेवाव्यात, अशी विनंती वजा सूचना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. या बंदमध्ये पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कडकडीत बंद असायला हवा असे ठाकरे यांनी सांगितले.

राजकीय बंद नव्हे –
बदलापूरमध्ये झालेल्या दुष्कृत्याचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने जाहीर केला आहे. हा बंद राजकीय नसून विकृतीचा निषेध आणि बंदोबस्त करण्यासाठी आहे. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे. ‘महाराष्ट्र बंद’ हा विकृतांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे.