आपल्या नागपूर येथील कार्यकर्त्यांच्या सभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ नागपूर शहरावरील कलंक’ असा उल्लेख करून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हल्ली उबाठा म्हणून ओळखल्या जाणार्या शिवसेनेचे नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातील वैफल्याची परिसीमा गाठली आहे असे म्हणावे लागेल.फडणविसांच्या कार्यक्षेत्रातच सभा असल्याने ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्ला चढविणे तसे अपेक्षितच होते पण त्यासाठी त्यानी ज्याला हलकट म्हणता येईल अशा भाषेचा वापर करणे मुळीच अपेक्षित नव्हते पण आपली पैत्रुक सम्पत्ती असलेली शिवसेना आणि तिच्याच नावाने मिळालेली सत्ता आपल्याच करणीमुळे हातातून निसटून गेल्याने उध्दव ठाकरे अक्षरशः बेभान झाले आहेत.त्या स्थितीसाठी फडणवीसच कारणीभूत असल्याचे पाहून तर त्यांचा फडणविसांबद्दल अंगाचा तिळपापड झाला आहे .फडणविसाना खाऊ की, गिळू अशी त्यांची मनस्थिति बनली आहे.पण त्यांनी त्यांच्यासाठी ‘ कलंक ‘ शब्दाचा वापर करून एकप्रकारे स्वतःवरच त्या शब्दाचा शिंतोडा उडवून घेतला आहे, नव्हे त्या शब्दाच्या घाणीत ते न्हाले आहेत.याचे महावैफल्याशिवाय कोणते कारण असू शकते?
खरे तर ज्यांच्याकडे कोणतेही कर्तृत्व नसते, ज्याना सगळे काही पूर्वजांच्या पुण्याईवरच मिळते, त्यांच्या हातचे थोडे जरी निसटले की, ते अस्वस्थ होतात. उध्दव ठाकरे यानी एक तर स्वतःच्या हातानेच राज्याचे मुख्यमंत्रिपद घालविले.त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे शिवसेना हे नाव व त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह त्यांच्या हातातून निसटले. विधान परिषदेतील उपाध्यक्षपदही नीलमताई गोर्हे यांनी शिंदेसेनेकडे नेले.अजितदादा भाजपासेनेसोबत गेल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काॅग्रेसकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि विधान परिषदेतील विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे केव्हा जाईल याचा भरवसा देता येत नाही. अशा स्थितीत अशा लोकांसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतात.एक म्हणजे प्रचंड मेहेनत करून गेलेले परत मिळविण्याचा प्रयत्न करणे वा सरळ घरात जाऊन बसणे.ज्यांच्यात या दोनपैकी एका मार्गाचा स्वीकार करण्याची हिंमत नसते आणि क्षमताही नसते, ते लोक हाताची बोटे मोडण्यात, लोकाना शिव्याशाप देण्यात वा आपल्यात आलेले वैफल्य प्रकट करण्यात धन्यता मानत असतात. देवेंद्र फडणवीस यांना ‘ नागपूरचा कलंक ‘ संबोधून ठाकरे यांनी तीच भावना प्रकट केली आहे.
वास्तविक जेव्हा आपण दुसर्याकडे बोट दाखवित असतो तेव्हा उरलेली चार बोटे आपल्याकडे असतात, असे म्हणण्याची हल्ली पध्दत आहे.त्यामुळे ती चार बोटे काय म्हणू शकतात याचा विचार करून मग आपले बोट उचलायचे असते.पण असा विचार करण्याची सवयच उध्दव ठाकरेंना नाही.कारण त्यांना जे मिळत गेले ते सगळे आयते मिळत गेले.त्यासाठी त्याना फारसे कष्ट करावे लागले नाहीत वा फारसा विचारही करावा लागला नाही.बाळासाहेब हयात असताना त्यांची छत्रछाया होती, ते गेल्यानंतर राज ठाकरे यांचा सन्मान राखत शिवसेनेची इमारत अधिक मजबूत करण्याची संधी त्याना होती पण तीही त्यांनी घालविली.नारायण राणेंसारख्या खंद्या शिवसैनिकाला बाहेर जाण्यास भाग पाडले.बाळासाहेब बेरजेचे राजकारण करीत होते तर हे महाशय वजाबाकीच्या राजकारणात गुंतले होते.भाजपासोबत सत्तेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधीही यांनी घालविली आणि मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपायी जनादेशाचा अपमान करण्याचा आरोपही त्यानी ओढवून घेतला.
शिवसेनेसारखे मजबूत संघटन त्यांच्या दिमतीला होते.भावनेच्या आधारावर त्याचे लाभ त्याना मिळत गेले.त्याना महाराष्ट्रव्यापी झंझावाती दौरा फारसा करावा लागलाच नाही.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मदतीला कोरोना आणि तब्येत ह्या दोन बाबी आल्यामुळे घरात बसण्यासाठी निमित्तच मिळाले.आताशा ते थोडे दौरे करायला वागले आहेत पण त्यांची संख्या किती, त्यासाठी टोमण्यानी भरलेल्या अद्वातद्वा बोलण्याशिवाय काय असते, हा प्रश्नच आहे.शिवाय बोलण्यापूर्वी विचार करायचा असतो, नेमके परिणामकारक काय बोलायचे असते हे ठरवायचे असते .पण त्याची त्याना गरजच वाटत नाही.कारण मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द झेलणारेच आजूबाजूला असतात.तरीही कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचा ‘ मनोहर जोशी’ होण्यास वेळ लागत नाही हे सर्वानाच ठाऊक आहे.
अशा वातावरणात वावरणार्या व्यक्तीला जेव्हा एकनाथ शिंदेसारखा ‘ रिक्षावाला ‘ पुढे सरसावतो, त्यांच्या डोळ्यादेखत चाळीसपन्नास आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला घेऊन जातो, देवेंद्र फडणविसांच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवितो, शरद पवारांसारख्या राजकारणधुरंधरालाही हरवितो तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल हे कुणीही समजू शकतो.त्यामुळे फडणविसांसाठी त्यांच्या तोंडून ‘ कलंक’ सारखा शब्द बाहेर पडणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे .एक प्रकारे नागपूरच्या सभेत ते सारे वैफल्यच त्यांच्या मुखातून बाहेर पडले.
तसे पाहिले तर फडणवीस हे काही महाराष्ट्राच्या राजकारणात अजातशत्रु नाहीत.त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांचे राजकीय विरोधक राज्याच्या राजकारणात आहेतच.पण त्यांच्यापैकी कुणीही त्यांचा असा उपमर्द कुणी करीत नाही.तो उध्दव ठाकरे यांना जेव्हा करावासा वाटतो तेव्हा आपण आपल्यातील वैफल्य जगजाहीर करतो आहोत हे भानही त्याना राहत नाही तेव्हा त्यांच्याविषयी फक्त कीवच यायला लागते.अशा स्थितीतच ‘ कोण होतास तू काय झालास तू ‘सारख्या काव्यपंक्ती जन्मास येत असाव्यात.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर