लोहारा, ता पाचोरा : लोहारा ग्रामपंचायतच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार आज १४ रोजी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनिकेत पाटील, पाचोरा गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, विस्तार अधिकारी राजेंद्र धस यांनी लोहारा ग्रामपंचायतला भेट देत सरपंच अक्षय जैस्वाल, ग्राम विकास अधिकारी गजानन काळे यांची झाडाझडती घेतली. यावेळी प्रत्यक्ष पायी फिरून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत, आठ दिवसात समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या.
कन्याशाळाच्या मागील अंगणवाडी क्रमांक ०२१३ या ठिकाणी भेट देत अंगणवाडी समोरच भले मोठे पाण्याचे डबके व घाणीचे साम्राज्य दिसून आले. याबाबत ग्राम प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले असून ३ ते ६ या वयोगटातील लहान बालक अंगणवाडीत येत असतात. या घाणीच्या प्रकारामुळे बालकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने आठ दिवसात ही समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. कन्या शाळेच्या एका बाजूला कंपाउंड नसल्याने शाळेत शौचास बसत असल्याने व मुक्त गुरे ढोरे फिरत असतात. त्याठिकाणी कंपाऊंड करण्याचे आदेश ग्रामपंचायातीला दिले.
तसेच शितला माता मंदिर परिसरात महिला शौचालयाची दुरावस्था,घाणीचे साम्राज्य याबाबत स्थानिक महिलांनी तक्रार करत ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले..व वेळोवेळी साफसफाई, स्वच्छता करण्याची मागणी महिलांनी केली.तसेच बाजार पेठ भागाची पाहणी त्या परिसरातील अंगणवाडी ची पाहणी केली.स्मशान भूमी ची देखील पाहणी करीत साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच महिला शौचालयाची दुरावस्था,म्हाडा कॉलनी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी म्हाडा चे अधिकारी,विस्तार अधिकारी,ग्रामविकास अधिकारी,सरपंच यांच्या समवेत एकत्रित बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.तसेच प्रथमेश मराठा समाजाला विकसित करणेसाठी दिलेल्या म्हाडा कॉलनीतील जागेसंदर्भात म्हाडा,जिल्हाधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करून हस्तांतरीत करण्याच्या सूचना दिल्या.गावातील सर्व समस्यांचा सर्व्हे करून त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.तसेच आठ दिवसांनी पुन्हा भेट देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी सांगितले.
यावेळी पाहणी करतांना त्यांचेसमवेत गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,ग्रामविकास अधिकारी गजानन काळे सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंचपदी दिपक खरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी,संभाजी चौधरी,नंदू सुर्वे, दत्तात्रय भोसांडे, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
सदर म्हाडाच्या जागेत मी घर नं ६, मध्ये गेल्या आठ वर्षापासून रहिवासी असून येथील सरपंच यांनी मला त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे नळ दिले नाही. आठ वर्षापासून मी विहिरीवरून पाणी भरत आहे. दोन वेळेस मूलभूत सुविधा मिळणे कामी मी ऑनलाईन अर्ज केला, तरीपण त्याला त्यांनी केराची टोपली दाखवत अर्ज बाजूला ठेवला. तुम्ही राहत असलेल्या माढाचे कोणतेही कागदपत्रे माझ्याकडे आलेले नाही, असे सांगत त्यांनी मला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे.
आता मला आशा आहे की उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष गावात आल्यामुळे मला न्याय मिळेल.
= नाना हिरामण पवार, लोहारा म्हाडा रहिवासी