उष्णतेच्या लाटेत जळगावकर होरपळला, या तारखेपर्यंत जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट

जळगाव । जळगावसह राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडल्यामुळे या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. या शहरांचे तापमान अनुक्रमे 45.3 आणि 45.5 अंश सेल्सियस होते. आगामी आणखी दोन दिवस जळगावकरांना तापमान वाढीचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला २५ मे पर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ मोठी वाढ झाली. यंदा मे हीटच्या तडाख्याने जळगावकरांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत जात आहे. दुपारनंतर तर शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. रात्रीही उष्ण वारे वाहत असून, रात्री २ वाजेपर्यंत तापमान ४० ते ३७ अंशांवर जात आहे.

भाजून काढणाऱ्या उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. मात्र आणखी दोन तीन दिवस जळगावकरांना आग ओकणाऱ्या सूर्याचा ‘ताप’ सहन करावा लागेल. हवामान खात्याने जळगावला २५ मेपर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून यादरम्यान तापमानाचा पारा ४६ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज आहे.

त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.