जळगाव : उष्मघातामुळे दहिगाव (ता. यावल) येथील वैभव धर्मराज फिरके (२७) या तरुण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, वाढत्या तापमानच्या पार्श्वभूमीवर २५ मे ते ३ जूनदरम्यान जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. शिवाय खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत.
दहिगाव (ता. यावल) येथील महाजन गल्लीत शेतमजूर वैभव धर्मराज फिरके (२७ ) हा वास्तव्यास होता. तो २५ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून घरी परतला, त्याचवेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखले केले. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत्यू घोषित केले.
दरम्यान, वैभव फिरके या तरुणाचा मृत्यू हा वाढत्या तापमानाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरी घटना आहे. मयत वैभव फिरके हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.