नवी दिल्ली । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाच्या रास्त भावात एफआरपी वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत उसाचा दर प्रति क्विंटल 315 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली ही आतापर्यंतची सर्वोच्च FRP आहे. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल. हा दर ऑक्टोबर ते सप्टेंबर या मार्केटिंग वर्षात लागू असेल.
तसेच उसाच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च रास्त आणि प्रति क्विंटल 315 रुपये भावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना तसेच साखर कारखानदार आणि संबंधित अनुषंगिक कामांमध्ये कार्यरत असलेल्या 5 लाख कामगारांना फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रणाम योजना आणि युरिया गोल्ड योजनेसह इतर अनेक योजनांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कृषी व्यवस्थापन योजनेसाठी पर्यायी पोषक तत्वांचा प्रचार (PRANAM) या योजनेचा उद्देश जैव खतांसह खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देणे हा आहे.
या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात केली होती. रासायनिक खतांवरील अनुदानाचा बोजा कमी करणे हा यामागील प्रमुख मुद्दा आहे, जो 2022-23 मध्ये 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.