एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढतेय; नक्की काय म्हणाले पंतप्रधान?

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे. त्यामुळे एआयच्या जागतिक नियमनावर एकत्र काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी जी२० शिखर परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी विद्यमान जागतिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, एआयच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करण्याची गरज आहे. एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे.
एआयच्या जागतिक नियमनावर एकत्रितपणे काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. डीपफेकचे गांभीर्य समजून घेऊन ते समाजासाठी आणि व्यक्तीसाठी किती धोकादायक आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून भारतात पुढील महिन्यात ग्लोबल एआय पार्टनरशिप समिट आयोजित केला असून यामध्ये जागतिक एकमत घडविण्यासाठी भारत सज्ज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पश्चिम आशिया क्षेत्रातील असुरक्षितता आणि अस्थिरतेची परिस्थिती जागतिक चिंतेचा विषय असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दहशतवाद हा सर्व जी२० सदस्यांना मान्य नाही. निरपराध नागरिकांचे होणारे मृत्यू निषेधार्ह आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला कोणतेही प्रादेशिक स्वरूप येणार नाही याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
त्याचवेळी आज ओलिसांची सुटका झाल्याचे वृत्त आशादायी असून लवकरच सर्व ओलिसांची सुटका होईल. त्यामुळे मानवतावादी मदत वेळेवर पोहोचविणे आणि त्याचे निरंतर वितरण आवश्यक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.