एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये तडजोड, वाचा सविस्तर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात न्यायालयात पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केला होता.या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर गुलाबराव पाटील आणि एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता झाल्यानंतर अब्रू नुकसानीचा दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. या मुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे

2016 मध्ये एकनाथ खडसे हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुद्धा केला होता.

दरम्यान, अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या गैरसमजतेतून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आला असल्याची पहिली प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.