एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?

मुंबई : महाराष्ट्रात बंड करून पुन्हा भाजपासोबत आलेल्या शिंदे सरकारला केंद्रात नेतृत्व मिळणार आहे. शिंदेंना दिल्लीवरुन बोलावणे आले असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत असून एक पद मिळते का दोन? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, शिंदे गटातर्फे खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळींचे नाव चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळ पुनर्रचना करणार आहेत. मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना केंद्रात मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. अशातच पंढरपुरात विठ्ठलपूजा झाल्यावर शिंदेंना दिल्लीत बोलविल्याचा फोन आला आणि लगबगीने ते निघालेही. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे १२ खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकारला वर्ष झाले आहे.

केंद्रात कोणाला मंत्रिपद मिळणार याचे पत्ते अजून एकनाथ शिंदे यांनी खोललेले नाहीएत. केंद्रात आपले बळ वाढविण्यासाठी शिवसेनेला मंत्रिपद लागणारच आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला यापूर्वीही दोनदा एकच मंत्रिपद मिळालेले होते. २०१४ मध्ये अनंत गिते आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत हे मंत्री होते. दोन्ही वेळी शिवसेनेला अवजड उद्योग मंत्रालयच मिळाले होते.

मोदी २०१९ च्या लोकसभेनंतर दुरावलेले आपले मित्रपक्ष जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. शिरोमणी अकाली दल, चिराग पासवान, शिवसेना आदींना आपल्यासोबत घेऊन लोकसभा लढविण्याची तयारी भाजपा करत आहे. यात शिंदे गटालाही संधी मिळणार आहे. मंत्रालयापेक्षा शिंदे गटाला केंद्रात आपली उपस्थिती दिसण्यासाठी मंत्रिपद हवे आहे. यामुळे शिंदे यांनी एका राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचे समजते आहे.