नवी दिल्ली : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भारतीय स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी पुढील महिन्यात आपली ‘सिंपल वन’ ही ई-स्कूटर लाँच करणार आहे. या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ओला, अॅथर, टीव्हीएस आयक्यूब सारख्या कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे कारण सिंपल वन ही ई स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल २३६ पेक्षा जास्त रेंज देईल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
सिंपल एनर्जीने गेल्या वर्षी आपली ई-स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली होती. परंतु काही उत्पादन समस्यांमुळे उत्पादन लाँच होऊ शकले नाही. आता सिंपल एनर्जीने एका निवेदनात म्हटले आहे की, सिंपल वन २३ मे रोजी बेंगळुरूमध्ये लाँच होईल. ही स्कूटर एका चार्जमध्ये २३६ किलोमीटरपर्यंत चालवता येते. यामध्ये कंपनीकडून ४.८KWH बॅटरी उपलब्ध आहे. तसेच, त्यातील मोटर ८.५ kW च्या पॉवरसह ७२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करू शकते. स्कूटरला शून्य ते ४० किलोमीटरचा वेग येण्यासाठी फक्त २.७७ सेकंद लागतात आणि तिचा वेग ताशी १०५ किलोमीटर आहे.
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरसाठी देशभरातून एक लाखाहून अधिक बुकिंग्स मिळाल्याची माहिती कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला दिली होती. हे अद्याप कंपनीने लाँच केलेले नाही, परंतु कंपनी भारतीय बाजारात १ लाख ते १.५ लाख रुपयांच्या दरम्यान लाँच करू शकते अशी अपेक्षा आहे. कंपनी सध्या स्कूटरसाठी बुकिंग घेत आहे आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ती १,९४७ रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.