मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी अन्नपाणी आणि औषधांचाही त्याग केला आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शेकडो मराठा बांधव अंतरवलीत एकवटले आहेत.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हीच आहे का शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला कुणीही शांत करु शकत नाही. मी या भारताचे जे पिलर असतात ५० टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.”
“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा. माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माझी मुलगी गेल्या आठ दिवसांपासुन शाळेत जात नाही. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे. हल्लेखोर माझ्याही घरी येणार होते. पोलिसांसमोर माझ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.” असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.