महसूल सप्ताहाच्या शुभारंभालाच घेतली लाच : बोदवड तहसीलचा क्लार्क जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : महसुल सप्ताहाच्या शुभारंभालाच एका हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या बोदवड तहसीलमधील पुरवठा विभागाच्या लाचखोर लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. उमेश बळीराम दाते (55, बोदवड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पुरवठा विभागाच्या कार्यालयातच दाते याला अटक करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील 40 वर्षीय तक्रारदाराने पुरवठा लिपिक दाते यांच्याकडे रेशन कार्डावरील त्यांच्या आईसह मुलाचे नाव कमी करण्यासाठी तसेच नवीन रेशन कार्डासाठी विचारणा केली होती व हे काम करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून एक हजारांची लाच मागण्यात आली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुरवठा विभागातील दालनातच दाते यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पथकाने त्यांना अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी

पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने व सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस नाईक सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.