मुंबई : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनटीपीसी) विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. एनटीपीसी भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे या बंपर भरती प्रक्रियेद्वारे तब्बल ३०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ६०,००० ते १,८०,००० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
एनटीपीसी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील सहाय्यक मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनन्स) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. या पदांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२३ आहे. उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल.
असा करा अर्ज
पात्र व इच्छुक उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत २ जून २०२३ आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करताना ३०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर एसटी, एससी, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक आणि महिलांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना शुल्क ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीनं भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पैसे भरू शकतात.
या पदांसाठी होणार भरती
एकूण ३०० सहाय्यक मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनन्स) पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, यामध्ये १२० पदं इलेक्ट्रिकल, १२० पदं मेकॅनिकल आणि ६० पदं इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील उमेदारांसाठी असतील. या भरती प्रक्रियेत नियमानुसार आरक्षण लागू असेल. सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार हा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशनमधील बीई / बी.टेकची पदवी मिळवलेला असावा. कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला पदवीला किती गुण असावेत, याबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.