नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून आजच सरकार स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्यता आहे. एनडीएचं सरकार स्थापन होण्याआधी मंत्रिपदाची वाटाघाची सुरु झाली. दरम्यान दिल्लीत 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहेत. तर नितीश कुमार यांना तीन, चिराग पासवान आणि जिंतनराम मांझी यांच्या पक्षाला एक, चंदाबाबू नायडू यांच्या पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळणार. शिवसेनेला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला असला तरी प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते. तसेच रामदास आठवले यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वाट्याला ‘ते’ ऐतिहासिक खाते?
रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग मंत्रालय येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि अवजड उद्योग मंत्रालय यांचे नाते जुने राहिले आहे. आजपर्यंत अनेकदा हे खाते महाराष्ट्रातील मंत्र्याच्या वाट्याला आले आहे.
एनडीएतील घटकपक्षांनी कोणती खाती मागितली?
तेलुगु देसम- लोकसभाध्यक्ष, रस्तेविकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान शिक्षण
संयुक्त जनता दल- कृषी, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास
जनता दल (धर्मनिरपेक्ष)- कृषी, पंचायत राज, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास
शिवसेना- अवजड उद्योग