पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. या वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवड यादी तयार होणार आहे, असा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अंतिम निकालाद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत होती. मात्र, उमेदवारांच्या शिफारशीनंतर नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे स्पष्ट होत होते.
यावर उपाय म्हणून राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून आलेला वैद्यकीय अहवाल आणि उमेदवारांनी दिलेला पदांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन अंतिम शिफारस करणे शक्य होण्यासाठी वैद्यकीय चाचणीसंदर्भातील कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झाल्यास शिफारसपात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असेल, असे नमूद करण्यात आले आहे.
वैद्यकीय तपासणीनंतरच्या अहवालावर उमेदवाराला दाद मागायची असल्यास त्यासाठी एमपीएससीकडून सात दिवसांचा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. दाद मागण्यासाठी उमेदवाराच्या खात्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा असेल. मुंबईतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात अपिलीय वैद्यकीय मंडळाची सरकारकडून स्थापना करण्यात येईल.