एरंडोल : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वस्तीगृहात तब्बल पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजवक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लैंगिक छळासह अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप
ऑगस्ट 2022 ते जून 2023 या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींच्या वस्तीगृहात पाच मुली वसतीगृहात अभिरक्षेत असतांना वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगिक छळवणूक केली तसेच अनैसर्गिक अत्याचारही केला. या प्रकाराबाबत मुलींनी संस्थेचे अधीक्षक व सचिव यांना वेळोवेळी सांगितला मात्र त्यांनी ही माहिती लपवून ठेवली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद सदाशीवराव बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह महिला अधीक्षक अरुणा पंडित यांच्याविरोधात भादंवि 354, 376 (2) (ड) (एन) (क), 377, पोस्को कलम 3,4,5, 6,8,9,10,12, 19, 21, सह अनुसूचित जाती व जमाती कायदा कलम 3 (1) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.