जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकल्याची घटना समोर आली असून या कारवाईने जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढताना दिसत असून यातच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं दिसून येत आहे. यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल येथील हॉटेल मयुरी गार्डन येथे पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती.
पत्त्यांच्या क्लबबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने क्लबवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत 1 लाख 31 हजार 140 रुपये रोख रकमेसह मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस पथकाने धाड टाकताच अन्य काही जण भिंतीवरून उड्या मारून फरार झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.