एलईडीच्या वापरामुळे रेल्वेत दरवर्षी 70 हजार युनिटची बचत : डीआरएम एस.एस.केडीया

भुसावळ : भुसावळ विभागात शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याने वर्षाला 404 कोटींची बचत होत असून 1.25 लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत होत असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडीया यांनी शनिवारी दुपारी डीआरएम कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, भुसावळ विभागातील रेल्वेची विविध शेडसह, सर्व लोकोमोटिव्ह कंपार्टमेंट असलेले दिवे काढून त्यांची जागा ही एलईडी दिव्यांनी घेतल्याने वर्षाला 49 हजार युनिट विजेची बचत होणार आहे तसेच लोकोमोटिव्ह (रेल्वे इंजिन) हेड लाईट इनॅन्डेन्सेंट दिव्याचे सुध्दा एलईडी लाईटात रूपांतर केले जात आहेे, परीणामी दर वर्षाला रेल्वेची 70 हजार युनिट विजेची बचत होईल.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
डीआरएम कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेचे प्रास्ताविक वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांनी केले. यावेळी डीआरएम एस.एस.केडीया, एडीआरएम सुनीलकुमार सुमंत, अभियंता पाटलासिंग, अभियंता निखील सिंग आदी अधिकारी, जीवन चौधरी आदी अधिकारी होते.

डिझेल इंजिनचा वापर पूर्णपणे बंद
डिझेल इंजिनमुळे देशातील चलन मोठ्या प्रमाणावर बाहेर जात होते मात्र आता रेल्वेचे विद्युतीकरण झाल्याने सर्वच ठिकाणी विद्युत लोको धावणार असून त्यातही आता थ्री फेज लोको आल्याने एका वर्षाला एक लाख युनिट विजेची बचत होणार आहे तर यंदा 62 हजार युनिटची बचत झाल्याचे निखील सिंग म्हणाले. मिशन रप्तार रेल्वे बोर्डाकडून संमत झाले असून अर्थसंकल्पातही त्यात तरतूद करण्यात आली असून यापूर्वी 25 केव्ही ओएचईला सप्लाय असलातरी आता तो 225 केव्ही केला जाणार असल्याने उच्च क्षमतेच्या गाड्यांचे वहन सुलभ होणार शिवाय त्या माध्यमातून गाड्यांची गतीदेखील वाढणार आहे. आगामी 2030 पर्यत संपूर्ण विभागात शुध्द शून्य कार्बन उत्सर्जक राहणार आहे. रेल्वेतर्फे एक एमडब्ल्यूपी रूफटॉप सोलर प्लँटची स्थापना होत असून त्यामुळे प्रतिवर्ष 7.64 लाख रुपयांची बचत होणार आहे. रेल्वेने 85 हजार लाईट आणि तीन हजार 500 पंखे बदलल्याने या माध्यमातूनही उर्जा बचत झाली आहे.

एसी-कुलरच्या माध्यमातून वार्षिक सात लाखांची बचत
रेल्वेने एक हजार नग 6 स्टार एसी बसविले असून 150 नग कुलर हे 5 स्टार दर्जाचे बसवल्याने उर्जेची बचत होणा आहे. यामुळे वर्षाकाठी रेल्वेची सात लाखांची बचत होणार आहे. विभागातील भुसावळ, नांदगाव, दुसखेडा व बडनेरा या स्थानकांवर पीआर मोशन सेन्सर प्रकाशयोजना लावण्यात आल्याने शंभर टक्के उर्चा बचत होत असल्याचे अधिकारी म्हणाले.