फैजपूर : संत-महात्म्यांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासीक फैजपूर नगरीत शुक्रवार, 10 फेब्रुवारीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने 22 युवारंग महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. चार दिवस चालणार्या या महोत्सवात धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून 104 महाविद्यालयांतील एक हजार 568 विद्यार्थी सहभागी झाले असून सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान, उद्घाटनप्रसंगी सिनेनाट्य कलावंत ओंकार भोजने म्हणाले की, हा युवक महोत्सव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या महोत्सवामुळेच माझे जीवन बदलले आणि आज मी एक सीने नाट्यकलावंत म्हणून आपल्यासमोर उभा आहे.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
युवारंग महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी, स्वागताध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, प्रमुख पाहुणे सह संचालक डॉ.संतोष चव्हाण, प्रज्ञावंत डॉ.नंदकुमार बेंडाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.सुनील कुलकर्णी, समन्वयक डॉ.एस व्ही जाधव, सहसमन्वयक डॉ.राकेश तळेले, युवा रंग महोत्सव सदस्य प्रा.स्वप्नाली महाजन, अमोल पाटील, सुरेखा पालवे, नेहा जोशी, डॉ.सुनील पवार, डॉ.पी.डी.पाटील, प्रा.अनिल पाटील, प्रा.एकनाथ नेहते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
‘दुनिया डोक्यावर घेणार हाय’ गीताने आणली रंगत
सिनेनाट्य कलावंत ओंकार भोजने म्हणाले की, युवारंग खूप महत्त्वाचा असून युवकांच्या जीवनामध्ये युवक महोत्सवाचे अनन्यसाधारण आहे. युवक आपण आपल्यातील कलागुणांना अशा व्यासपीठावरून सादर करून जीवनात मोठा होवू. टीम वर्क हा एक महत्त्वाचा गुण या ठिकाणी आपण शिकतो आणि प्रत्येकाचे विचाराच्या आदान-प्रदान करून आपल्या जीवनात तसा बदल घडवू शकतो. कुठलाच रस्ता हा आपल्याला एकटाच चालावा लागला नाही तर कुठेतरी आपणास एकमेकांची साथ घ्यावी लागते म्हणून आपण युवारंग कार्यक्रमातून हे शिकू शकतो. दुनिया डोक्यावर घेणार हाय र… तुला उचलून घेणार हाय र… हे गीत त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सुरुवातीला संस्थागीत, बहिणाबाईंचे कविता धनाजी नाना महाविद्यालयाच्या कलाकारांनी सादर केली. प्रास्ताविक धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी करून दिली. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभाग संचालक सुनील कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ.राजेंद्रसिंह राजपूत व डॉ.राजश्री नेमाडे यांनी व आभार उपप्राचार्य डॉ.शंकर जाधव यांनी मानले.