ऐन उन्हाळ्यात राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज ; जळगावात दोन दिवस अशी राहणार स्थिती?

जळगाव/पुणे । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात 8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नेमका IMD अंदाज काय?
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या परिणामी विदर्भात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Image

कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट
आयएमडीकडून राज्याच्या काही भागात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये आज हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे