ऐन दिवाळीत एसटी महामंडळाकडून भाडेवाढ ; पहा किती झाली वाढ?

मुंबई । एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दिवाळी सण आता काही दिवसांवर असतानाच राज्याच्या एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागणार आहे.

एसटी महामंडळाने सर्व प्रकाराच्या एसटी गाड्यांमध्ये सरसकट १०% भाडेवाढ केली आहे. ८ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दिवाळीत शाळा-महाविद्यालयांनाही मोठी सुट्टी असल्याने सहकुटुंब गावी जाण्यासाठी गर्दी असते. यामुळे रेल्वे, खासगी गाड्यांसह एसटीही प्रवाशांनी भरून धावत असतात.

मात्र अशातच ,महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. यंदा ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अर्थात ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या सर्व बसश्रेणींमध्ये १०% भाडेवाढ लागू करण्यात येत आहे. २८ नोव्हेंबरनंतर मुळ दराने तिकीट आकारणी सुरू होणार आहे. आरक्षित तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडेदरातील फरकाचे पैसे प्रवास करताना द्यावे लागणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.