ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरांनी फोडला ग्राहकांना घाम ; आज प्रति तोळ्याचा दर काय?

जळगाव । सोने आणि चांदीचे दरात सतत चढ-उतार दिसून येत आहे. ४ डिसेंबर रोजी उच्चांकी गाठलेल्या सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्याच्या दिलासा मिळाल्याचे दिसून आले. मात्र भारतीय सराफा बाजारात काल गुरुवार दोन्ही धातूंमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा ६३ हजाररुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. चांदीचा भाव प्रतिकिलो ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

सणोत्सवानंतर लग्नसराई सुरु होताच मौल्यवान धातूने मुसंडी मारली. ऐन लग्नसराईच्या काळात दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यानंतर या आठवड्यात सलग तीन दिवसांत दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. मोठ्या पडझडीनंतर सोने-चांदीने पुन्हा युटर्न घेतला. गुडरिटर्न्सनुसार, कालच्या दरवाढीनंतर 22 कॅरेट सोने 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान, या आठवड्यातील सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. बुधवारी 13 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. यामुळे सोन्याचा दर ६२ हजाराखाली आला होता. मात्र काल 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली.

दुसरीकडे या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3500 रुपयांची घसरण झाली होती. गुरुवारी चांदीत 2500 रुपयांची उसळी आली. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 13 डिसेंबर रोजी भाव 700 रुपयांनी उतरले होते. 14 डिसेंबर रोजी चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,500 रुपये आहे.