मुंबई : ऐन लग्नसराईचे दिवस सुरु असून अशातच सोन्याच्या किमतीने नवा रेकॉर्ड केला आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने देशांतर्गत बाजारात किंमती 62000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या आहेत. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात 940 रुपयांची उसळी पाहायला मिळाली. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 62,020 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
तसेच चांदीचा भावही 700 रुपयांनी वाढ दिसून आली असून यामुळे एक किलो चांदीचा दर 77,000 रुपये किलोवर गेला आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली. सोन्याचा दर 63 रुपयांनी वधारला असून यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 61,556 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदी दर 147 रुपयांनी वाढला असून एक किलोचा चांदीचा दर 78,185 रुपयांवर व्यवहार करत आहे.
दरम्यान, 2023 मध्ये सोन्याची किंमत सातत्याने नवीन उंची गाठत आहे. 2013 मध्ये सोन्याचा दर 29000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि अवघ्या 10 वर्षात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 33000 ते 34000 रुपयांनी वाढला आहे. म्हणजेच 10 वर्षात सोन्याच्या किमतीत 113 टक्क्यांनी वाढ झाली आहे.