लुसाने : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक पटकावल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आता लुसाने डायमंड लीग स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी रंगणाऱ्या या स्पर्धेतून चमकदार कामगिरी करत पुढील महिन्याच्या सत्रात पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धार नीरजने केला आहे.
प्रदीर्घ काळापासून मांडीच्या दुखापतीने ग्रस्त राहिल्यानंतर नीरजने ८ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटरची फेक करत रौप्य पटकावले होते. नीरजने शनिवारी या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०२२ मध्ये नीरजने डायमंड लीग स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी मात्र त्याला अमेरिकेत झालेल्या डायमंड लीग अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाड्लेचनंतर दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
यंदा डायमंड लीग अंतिम फेरी १४ सप्टेंबरला ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे होईल. अंतिम फेरीसाठी नीरजला डायमंड लीग सीरिजपर्यंत अव्वल सहा स्थानांमध्ये रहावे लागेल. ५ सप्टेंबरला ज्यूरिख येथे आणखी एक डायमंड लीग स्पर्धा होणार असून, यामध्येही पुरुष भालाफेकीचा समावेश आहे. १० मे रोजी झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये वाइलेचनंतर दुसऱ्या स्थानी राहिलेला नीरज सध्या ७ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
दरम्यान, नीरजने पॅरिसमध्ये निश्चितपणे रौप्यपदक जिंकले आणि त्याच्या चेहऱ्यावर निराशा नक्कीच दिसून आली की या निराशेचे दुसरे कारण म्हणजे त्याची कामगिरी. अंतिम फेरीत, नीरजच्या सहा थ्रोपैकी फक्त एकच वैध मानला गेला, ज्यामुळे त्याला पदक जिंकण्यात मदत झाली. उरलेले 5 थ्रो एकतर फाऊल होते किंवा खराब थ्रोमुळे जबरदस्ती फाऊल होते. त्याच वेळी, तो पुन्हा एकदा 90 मीटरचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरला, ज्याची तीव्रता त्याच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून आली. या ९० मीटरचा शोध घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा अव्वल स्थानी राहून विजयाची नोंद करण्याची सवय कायम ठेवण्यासाठी नीरज डायमंड लीगच्या या लुझन लेगमध्ये भाग घेत आहे.