पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतू भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांनतर काही विरोधी खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला.
महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली आहे.
दरम्यान, हा विनेशचा नसून देशाचा अपमान असल्याचे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे. विनेश फोगट संपूर्ण जगात इतिहास घडवणार होती, तिला 100 ग्रॅम जास्त वजन दाखवून अपात्र ठरवणे हा घोर अन्याय आहे. संपूर्ण देश विनेशच्या पाठीशी उभा आहे. भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून ही बाब मान्य न केल्यास ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे.