ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…

तरुण भारत लाईव्ह । ओडिशा : शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण टक्करनंतर १० हून अधिक बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात आतापर्यंत २३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ९०० हून अधिकजण जखमी झाले. या अपघातात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक दलांव्यतिरिक्त लष्कर आणि हवाई दलही बचाव कार्यात आहेत. जखमींना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवारी सकाळी बचावकार्याची माहिती घेतली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले, अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मंत्रालय, केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर जखमींना सर्वतोपरी मदत करत आहेत.

या भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आपण स्वतः या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून निकाल लागेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा

बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात ९०० हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर ओडिशातील हॉस्पिटलबाहेर रक्तदान करण्यासाठी आलेल्यांची रांग लागली आहे. एवढ्या संख्येने लोक इथे कसे आले हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. हे सर्व लोक केवळ रक्तदान करण्यासाठी आले आहेत असे त्यांना समजले. या लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी आहे हेच यातून दिसते.