ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाला नवं वळण, सिग्नल इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर ट्रेन अपघातप्रकरण मोठी अपडेट समोर येत आहे. सीबीआयने तपास सुरु केला असून बालासोर रेल्वे स्टेशन परिसर सील केल्यानंतर आता सिग्नल यंत्रणा हाताळणार्‍या इंजिनिअरचे घर सील करण्यात आले आहे. तो आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली आहे. ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला अपघात झाला होता. एसएमव्हीपी-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्या होत्या. याची चौकशी सीबीआयने ६ जून रोजी हाती घेतली होती. या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआयकडे तपास गेला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर रेल्वे स्टेशनही सील करण्यात आलं. सिग्नल यंत्रणेशी संबंधित इंटरलॉकिंग पॅनलही सील करण्यात आला. तसेच पुढील सूचना येईपर्यंत कोणतीही ट्रेन बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबवली जाणार नाही.

यानंतर सीबीआयने सिग्नल जेईची पुन्हा चौकशी करण्यासाठी त्याचा शोध घेतला. परंतू, तो आणि त्याचे कुटुंबीय अपघाताच्या दिवसापासून पसार झाले आहेत. तो राहत असलेले भाड्याचे घरही बंद आहे. अखेर सीबीआयने ते घर सील केले आहे. सीबीआयच्या सुत्रांनी सांगितले की, सिग्नलच्या ज्युनिअर इंजिनिअरची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. सीबीआयने १६ जूनला बालासोर सोडले होते, यानंतर ते अचानक सोमवारी आले आणि ज्युनिअर इंजिनिअरचे घर सील केले. सहा जूनपासून सीबीआयने अपघाताची चौकशी हाती घेतली आहे.