मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज २९ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणार नाहीत, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिले आहे. तसेच ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर सरकार सकारात्मक असल्याचे ओबीसी नेते आशिष देशमुख यांनी सांगितले आहे.
बिहारमधील जातीय जनगणनेच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातही जनगणना करण्यावर अभ्यास करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे. तसेच उद्याचा चंद्रपूर बंद ओबीसी महासंघाने मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरातील ओबीसी तरुणांचे उपोषण सोडवण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासोबतच नागपुरातील संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन २१ व्या दिवशी मागे घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. ओबीसींच्या २२ मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.