जळगाव : जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकायला लागलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जळगावचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरामध्ये नाव नोंदविण्यात आलं आहे. मे हीटमुळे जिल्ह्यात उष्माघाताचा त्रास होणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्हयात तब्बल उष्मघाताने चार बळी गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रावेर तालुक्यातील नम्रता चौधरी या कुटुंबासमवेत उन्हात नातेवाईकांच्या एका धार्मिक कार्यासाठी गेल्या हाेत्या. परतीच्या प्रवासानंतर त्यांना बस स्थानक परिसरात उलट्या झाल्या आणि चक्कर आली. त्यामुळे त्या घटनास्थळीच कोसळल्या. नम्रता यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास नेले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी नातेवाईकांना सांगितलं. नम्रता चौधरी यांची लक्षणं पाहता त्यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी अमित मित्तल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बाेलताना संबंधित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे असा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, अमळनेर शहरातील रुपाली राजपूत या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी घडली होती.
कजगावातील तरुणाचा उष्माघाताने मृत्यू
कजगाव, ता.भडगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (29) या तरुणाला शनिवार, 13 रोजी सायंकाळी अस्वस्थ वाटल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या पश्चात एक दिड वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे. तो रत्नाकर सोनार यांचा मुलगा होय. तरुणाच्या मृत्यूनंतर सराफा व्यावसायीकांनी दिवसभर आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुण पित्याचा मृत्यू
पुण्यात रेल्वेत नोकरीस असलेल्या मात्र भुसावळातील मूळ रहिवासी असलेला गिरीष शालिग्राम पाटील (29) या तरुणाचा उष्माघाताने फटका बसल्याने सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. गिरीश हा तरुण गाडेगाव, ता.जामनेर येथे सासुरवाडीला मुलीला पाहण्यासाठी रविवारी गेल्यानंतर सायंकाळी परतला मात्र दुसर्या दिवशी सोमवार, 15 मे रोजी सकाळी त्याला अस्वस्थ वाटल्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले उपचाराच्या दहा मिनिटातच तरुणाचा मृत्यू ओढवला.
दरम्यान गिरीषचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ.मानवतकर यांनी दिली. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.