देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे आगीच्या भट्टीत जाण्यासारखे आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक लष्करी जवान उग्र वाळवंटात वाळूवर पापड भाजताना दिसत होता आणि आता या तरुणीच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, ज्यामध्ये तिने कडक उन्हात तेल गरम केलं आणि त्यात मासे तळले. हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून उष्णतेने खरोखरच कहर केला असल्याचे सांगत आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या दगडावर तेलाने तळण्याचे पॅन ठेवले आहे. मग एक मुलगी हातात प्लेट घेऊन येते, ज्यामध्ये एक मासा आहे. ती मासे उचलते आणि फ्राईंग पॅनमध्ये ठेवते आणि तळायला लागते. ती सांगते की अति उष्णतेमुळे तेल स्वतःच गरम झाले आहे, ज्यामध्ये मासे देखील आरामात तळले जाऊ शकतात. सूर्यप्रकाशात तेल तापले आणि त्यात मासे तळलेले हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. उर्मी असे या मुलीचे नाव असून हा व्हिडिओ बंगालचा असल्याचे दिसत आहे, कारण मुलगी बंगाली भाषेत बोलताना दिसत आहे. तरी तरुण भारत लाईव्ह याची पुष्टी करत नाही.
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर foodiesuman1 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘उर्मीने सूर्याच्या उष्णतेत मासे कसे शिजवायचे ते दाखवले’. हा व्हिडिओ आतापर्यंत 5.6 मिलियन म्हणजेच 56 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे.
त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कोणी दावा करतंय की तेल आधीच गरम होतं, उन्हात तेल गरम होत असल्याचा दावा खोटा आहे, तर कोणी म्हणतंय की ‘आता काही दिवसांनी माणसंही अशी तळली जातील’, तर काहींनी मुलीला ट्रोलही केलं विचारले की एवढा सूर्यप्रकाश आणि उष्णता असताना तुम्हाला काहीच का झाले नाही?