कन्नड घाट या तारखेपासून जड वाहतुकीसाठी बंद ; या वाहनांना असेल परवानगी

चाळीसगाव । कन्नड (औट्रम) घाटातील वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहन धारकांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने 11 ऑगस्टपासून कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अ‍ॅड. ज्ञानेश्वर बागूल, अ‍ॅड. निलेश देसले आणि अ‍ॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी ११ ऑगस्टपासून या घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घातली. सात दिवस शासकीय यंत्रणेने याबाबत प्रबोधन करावे, असे निर्देशही न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत

या वाहनांनाच परवानगी :
औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे.

या वाहनांना असेल घाटातून बंदी
जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली.