कर्जदारांसाठी RBI चा मोठा दिलासा ; रेपो दराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज, ८ डिसेंबर रोजी आपले अंतिम पतधोरण जाहीर केले असून त्यानुसार सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज आपल्या भाषणात ही घोषणा केली आहे. यावेळीही रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम असणार आहे.

दरम्यान, आरबीआयने गेल्या चार चलनविषयक समितीच्या आढावा बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून मुख्य व्याजदर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असून यावेळी आरबीआय महागड्या कर्जातून काहीसा दिलासा देणे कर्जदारांना अपेक्षित होते मात्र, तसे झाले नाही. परंतु दिलासादायक म्हणजे रेपो दर कमी झाला नसला तरी वाढलाही नाही.

आरबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. याशिवाय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जीडीपी वाढीचा अंदाज जाहीर केला. आर्थिक वर्ष 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.4 टक्के ठेवण्यात आला आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, देशांतर्गत मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली वाढ होत असून ऑक्टोबरमध्ये 8 प्रमुख उद्योगांच्या वाढीत सुधारणा होत आहे. याशिवाय उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे उत्पादन क्षेत्र मजबूत झाले आहे आणि ग्रामीण मागणीत सुधारणा दिसून येत आहे. सरकारी खर्चामुळे गुंतवणुकीचा वेग वाढला असून सणासुदीच्या मागणीमुळे देशांतर्गत वापर वाढला आहे.